Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ७

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ७


आणि तेवढ्यात...
हॉर्नचा तीव्र आवाज त्या अंधाराला चिरत आला...
एक गाडी वेगात थांबली...

गाडीचा आवाज जवळ येताच... त्या अंधाऱ्या रस्त्यावर एक वेगळाच थरार पसरला होता...

ती गाडी साधी होती..., ना फार महागडी होती..., ना लक्ष वेधून घेणारी मॉडेलची होती.‌..
पण तिचा तो थांबणारा अंदाज..., त्या गाडीचा अचानक ब्रेक्सचा आवाज... आणि हेडलाईट्सचा थेट उजेड
त्या तिघांच्या चेहऱ्यावर पडताच...
ते तिघे दचकले... त्यांचा आत्मविश्वास क्षणात गळून पडला होता...

“ए! काय चाललंय इथे...?”
त्या गाडीमधून ठाम, कडक आवाज आला...
आणि एक पुरुष गाडीतून खाली उतरला...

गाडीतून उतरलेला तो पुरुष
साधारण पंचविशीच्या उत्तरार्धातला वाटत होता...
उंच, सडपातळ देहयष्टी, स्थिर देहबोली, डोळ्यांत रागाची ठिणगी होती...
खांद्यावर हलकीशी वाकलेली बॅग, अंगात साधा शर्ट आणि जिन्स घातले होते...

पण चेहऱ्यावर एक वेगळीच स्थिरता होती...
त्याच्या डोळ्यांत ना घाई होती, ना घबराट होती...
फक्त परिस्थितीचा अचूक अंदाज आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची तयारी होती...

तो दोन पावलं पुढे आला... त्याच्या आवाजात करडी कडकपणा होता,
पण शब्द मोजके आणि ठाम होते... त्याने पुन्हा एकदा त्या कडक आवाजात विचारले...
“काय चाललंय इथे...?”
खरंतर हा प्रश्न साधा होता, पण त्यात अधिकार होता...

त्याने गौरवीकडे एक नजर टाकली... ती नजर तपासणारी किंवा वासनेने भरलेली किंवा कपड्यांच्या आत डोकावणारी नव्हती, किंवा तीच्या शरीराच्या अवयवांची मोजमाप करणारी नव्हती,
किंवा दया दाखवणारीही नव्हती...

ती नजर होती फक्त...
समोर उभी असलेली व्यक्ती सुरक्षित आहे का...?
हे पाहणारी.

क्षणभर त्याच्या भुवया एकमेकांना जुळतात... आणि कपाळावर आठ्यांचे जाळं पसरतं... तर त्याच्या चेहऱ्यावर रागाची हलकीशी लाट सुद्धा पसरली जाते...

त्याची नजर पुन्हा त्या पुरुषांकडे वळते...
“तिला सोडा... आत्ताच्या आत्ता...”
त्या आवाजात भीती नव्हती... तर एक जरब आणि आदेश होता... आणि फक्त एक स्पष्ट इशारा होता...

एक क्षण सगळे स्तब्ध झाले...
“चला रे… नको झंझट आपल्याला कसली…”
एकाने कुजबुजत मागे पाऊल टाकलं...
पण त्यातला तो एक माणूस पुढे सरसावला...

त्याला असं पुढे येताना पाहून... त्या गाडीवाल्या तरुण युवकाने आपल्या खिशातील मोबाईल फोन काढत हातात घेत म्हणाला...
“पोलिसांना फोन लावतोय... आता कुठेही पळालात तरी सुटणार नाही...”

इतकं ऐकताच त्या तिघांनी मागे पावलं टाकली...
कुणीही डोळ्यात डोळे घालायची हिंमत करत नव्हतं...
ते तिघांनी पाटच्या पाटी  पळ काढला...

गौरवी मात्र जिथे उभी होती तिथेच उभी शांतपणे, थरथरत, घाबरत, सर्व काही बघत उभी होती...

ते सर्व गुंड, नराधम पळून गेल्यावर
तो तरुण युवक हळूच गौरवीकडे वळतो...

त्या तरुण मुलाने तिच्याकडे पाहिले...
त्याचा आवाज अचानक बदलतो...
सौम्य, सावध, आदराने भरलेला होता...
आणि तो आवाज सौम्य करत म्हणाला...
“घाबरू नकोस...  तु आता सुरक्षित आहेस...”

गौरवी मात्र काही बोलूच शकली नाही... फक्त तीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत असतात... आणि पाय थरथर कापत असतात...

तो तिच्या खूप जवळ जात नाही... तिच्या हाताला स्पर्श करत नाही... फक्त गाडीचा दरवाजा उघडतो... आणि दोन पावलं मागे सरकतो...
जणू तिला निर्णय घेण्यासाठी अवकाश देतो...

गौरवी त्याच्याकडे पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी बघते...
तो शांतपणे गाडीच्या आत हाताने इशारा करतो... आणि प्रेमळ शब्दांत बोलतो...
“बस... आपण पहिले सुरक्षित ठिकाणी जाऊ...

गौरवी क्षणभर थांबते… मग हळूच मान हलवते... आणि आपले डोळे पुसत शांत मनाने त्याच्या गाडीत बसते...
गाडी सुरू होते... आणि काही अंतरावर गाडी गेल्यावर तो तरुण युवक बोलू लागतो...
“माझं नाव आरव...”

आणि तो थोडा थांबून म्हणतो...
“मी इथून जात होतो… पण हे दिसलं म्हणून थांबलो...
तुला कुठे जायचं असेल तसं सांग नाहीतर मी तुला आधी सुरक्षित ठिकाणी सोडतो.”

त्याच्या बोलण्यात उपकाराची अपेक्षा नव्हती..., ना प्रश्नांची गर्दी होती..., फक्त एकच गोष्ट होती... आणि ती म्हणजे
'माणूस म्हणून माणसासमोर संकटाच्या वेळी उभं राहणं...'

गाडी पुढे सरकते... आणि गौरवी पहिल्यांदाच
त्या रात्री नीट श्वास घेते...
त्या अंधारात, त्या गोंधळात, तिला अचानक असं वाटतं...
आज कुणीतरी तिला वाचवलं आहे...
फक्त शरीराला नाही… तर पूर्णपणे तुटू पाहणाऱ्या तिच्या अस्तित्वाला... ही मदत अपघात नव्हता… तर ही माणुसकी होती...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all